अभियंता हेच खरे शिल्पकार- इंजि.सौ. अश्विनीताई पाटील
जिल्हा परिषदेत अभियंता दिन; यावर्षापासून आदर्श अभियंता पुरस्कार देणार
धुळे – तंत्रज्ञान असो अथवा वास्तू निर्माण यामध्ये आपली कल्पकता वापरणारे अभियंता हेच खरे शिल्पकार आहेत असे प्रतिपादन धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा इंजि. सौ. अश्विनीताई पाटील यांनी आज येथे केले.
धुळे जिल्हा परिषद अभियंता संघटने मार्फत सर विश्वेश्वरय्या यांच्या जयंती दिनानिमित्त अभियंता दिनाचा कार्यक्रम शुक्रवारी सकाळी धुळे जिल्हा परिषदेच्या कै.यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष इंजि. सौ. अश्विनीताई पाटील बोलत होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शुभम गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून कृषी व पशुसंवर्धन सभापती श्री हर्षवर्धन दहिते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री चंद्रकांत पवार, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री मुकेश ठाकूर, पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती जयश्री सारवे, ताण तणाव व्यवस्थापन मार्गदर्शक श्री अशोक देशमुख, इंजिनियर श्री एस एस दुसाने आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सौ पाटील पुढे म्हणाले की मी स्वतः एक आयटी इंजिनियर आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. इंजिनीयर कडे असलेल्या कल्पकतेतून तंत्रज्ञान असो अथवा वास्तू निर्माण विकसित होत असते असे सांगून त्यांनी चांगले काम करावे असे आवाहन केले.
याप्रसंगी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शुभम गुप्ता म्हणाले की अभियंता दिनानिमित्त अतिशय सुंदर उपक्रम आयोजित केला आहे. आपण सर्वजण चांगले काम करीत आहात, त्यास प्रशासनाच्या वतीने पाठबळ आहे. आगामी काळात देखील आपण आपल्या विभागामार्फत स्मरणात राहील असे चांगले काम करावे असे आवाहन श्री गुप्ता यांनी केले.
सभापती हर्षवर्धन दहीते म्हणाले की, सर विश्वेश्वरय्या यांनी दातर्ती धरण निर्माण करताना केलेले काम आजही स्मरणात आहे. त्याचा लाभ अनेक शेतकऱ्यांना होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
ताण तणाव व्यवस्थापन यावर विशेष निमंत्रित श्री अशोक देशमुख यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. तर इंजिनीयर एस एस दुसाने यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री चंद्रकांत पवार, कार्यकारी अभियंता श्री मुकेश ठाकूर यांनीही मार्गदर्शन केले.
दरम्यान या वर्षापासून आदर्श अभियंता पुरस्कार देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. ग्रामीण पाणीपुरवठा विभागातून सहाय्यक अभियंता शिरपूर श्री अमित शिंदे, बांधकाम विभाग पंचायत समिती धुळे येथील शाखा अभियंता श्री पी एन पवार, लघु सिंचन विभाग पंचायत समिती धुळे येथील शाखा अभियंता श्री के.डी. देवरे, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद धुळे येथील शाखा अभियंता श्रीमती अनिता कोतवाल यांना या वर्षाचा आदर्श अभियंता पुरस्कार जाहीर करण्यात आला. लवकरच जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते एका कार्यक्रमात हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. तसेच अभियंता संघटनेने केलेल्या मागण्याही यावेळी प्रशासनाच्या वतीने मान्य करण्यात आल्या. त्यात जिल्हा परिषदेतील अभ्यागत कक्षास सर विश्वेश्वरय्या असे नामकरण करणे, अभियंता संघटनेच्या जिल्हा कार्यालयाकरिता जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव शासनास सादर करणे या मागण्याचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभियंता संघटनेचे जिल्हाध्यक्ष इंजिनीयर जयदीप पाटील यांनी केले. सूत्रसंचालन अभियंता संघटनेचे सचिव श्री हिरालाल पाटील यांनी केले.
सदर कार्यक्रमास संघटनेचे कार्याध्यक्ष श्री महेंद्र पाटील, राज्य संघटक श्री मुकेश परदेशी, उपाध्यक्ष श्री धनंजय देसले, श्री अजय पाटील , दीपक चंदन यांच्यासह बांधकाम लघु सिंचन आणि पाणीपुरवठा विभागातील अभियंता मोठ्या संख्येने उपस्थित होते.